Friday, November 13, 2015

हवाई नानू

नाही नाही, नानूचा आणि श्रीदेवीच्या हवाहवाई चा काही संबंध नाही, आणि नानू क्रिसमसला सुट्टीवर हवाईलाही जात नाहिये. मामला वेगळाच आहे. 
नोव्हेंबरचा महिना वेगवेगळ्या कारणासाठी महत्वाचा महिना ठरतो. आपली दिवाळी याच महिन्यात असते किंवा नुकतीच होउन गेली असते.  काही (पुरूष) मंडळी दाढी-मिशा वाढवून (नो-शेव नोव्हेंबर) प्रोस्टेट कॅंसर बद्धल जनजागृती करत असतात. (या नो-शेव नोव्हेंबरला सपोर्ट म्हणून या वेळी दिवाळीला आम्ही पण शेव केली नाही, फक्त चकल्या केल्या). पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थॅंक्सगिव्हींग आणि त्याच्या दुसर्‍यादिवशी असणारा समस्तांस आवडणारा ब्लॅक-फ्रायडे. ब्लॅक-फ्रायडे म्हणजे गिर्‍हाईकांची पर्वणीच. सगळ्या दुकानांमधून भरपूर सेल लागलेले असतात. कुठल्या दुकानातून काय आणायचं याच्या याद्या बनवून तय्यार असतात. पहाटेपासून किंवा रात्रीपासूनच काही दुकानांच्या बाहेर रांगा लाऊन हौशी मंडळी बसलेली असतात .. वगैरे वगैरे. मला असल्या लोकांबद्धल प्रचंड आदर असला तरी सुट्टीच्या दिवशी पहाटे उठून कोणी अर्ध्या भावात तूरडाळ जरी दिली तरी मी जाणार नाही.
माझ्यासारख्या आळशीमाणसांसाठीच इंटरनेटचा शोध लागला आहे त्यामुळे इंटरनेटवर कुठे काय सेल आहे ते बघत लंचटाईम मधे बसलो होतो. मागून पाठीवर नानूची पेटंट थाप पडली. "काय बेत आहे? काय काय घेणारेस येत्या ब्लॅक-फ्रायडेला?" त्यानं विचारलं. "बघतोय नुसतं. काही ठरवलं नाहीये. तू सांग, तूझा काय प्लॅन?". नानू याच प्रश्नाची वाट बघत होता. बर्‍याच लोकांना ही एक सवय असते, गेल्या सुट्टीत कायकाय मजा केली हे त्यांना सांगायचं असतं.पण कोणी विचारल्याशिवाय कसं सांगणार? मग ते दुसर्‍याला विचारतात "काय केलं सुट्टीत?"; बहुतेक वेळेला दुसरा माणून प्रतिप्रश्न करतोच आणी मग त्यांना साग्रसंगीत सुट्टीचा वृतांत देता येतो. नानू अशा लोकांपैकीच एक. त्यामुळे मी त्याला विचारताच त्याचे डोळे चमकले. खुर्चीचा पुढा माझ्याकडे वळवत त्याने सुरवात केली.
"मला गो-प्रो क्यामेरा घ्यायचाय". आता हा गो-प्रो क्यामेरा उंच डोंगरांवरून बर्फावरून घसरणारी, किंवा सायकल / मोटारसायकलवरून गडगडणारी वगैरे मंडळी त्यांचा उपद्व्याप टिपण्यासाठी करतात हे मला माहीत होतं. पण खुर्चीतल्या खुर्चीत बसणारा नानू याचा काय उपयोग करणार हे मला समजेना! माझा चेहरा प्रश्नार्थक झाला असावा, कारण नानूने लगेच खुलासा सुरू केला. "अरे मी ते ड्रोन क्वाडकॉप्टर पण घेणारे" ... अरे देवा! गेल्याच आठवड्यातल्या काही बातम्या माझ्या डोळ्यासमोरून गेल्या.   कोणीतरी त्या रिमोटवर चालणार्‍या द्रोणाला क्यामेरा अडकवून शेजारपाजार्‍यांच्या भिंतीवरून डोकावून बघायचा प्रयत्न केला. पण शेजारी महा-रागीट! त्याने बंदुकीने सरळ त्या द्रोणाला गोळी घातली... आणि मग त्यांनी एकमेकांवर दावा केला...ई.ई. आता हे नानू महोदय पण असलंच काही करणार की काय? मी आपल्या त्याला मित्रत्वाचा सल्ला दिलाय की बाबारे, असलं काही करून नकोस. पण नानूचे पंख छाटणे अवघड आहे. आगे क्या होगा खुदा जाने!

Friday, October 23, 2015

नानू के कारनामे

आपल्याकडे गणपती आणि नवरात्रात जिलेबी-बाई, मुन्नी, शी शी शी शीला आणि आजची लेटेष्ट शांताबाई (शेळके नव्हे) वगैरेंना निरोप देऊन झाले की दिवाळीचे वेध लागतात आणि इथे लोकांना हॉलोवीनचे. आमच्या ऑफिसमधे बर्‍याच लोकांनी आपल्या 'अंदरके हैवानको' जागा करून भिंतींवर वगैरे टांगलं होतं.  भुताखेतांचं एवढं काय आकर्षण आहे कोणास ठाऊक पण या काळात जळीस्थळी चेहरे रंगवलेले किंवा मुखवटे चढवलेले पुतळे आणि भोपळ्याला खरवडून त्याच्यावर केलेली "कलाकुसर" जागोजागी पाहायला मिळते.

तर, ऑफिसला येउन खुर्चीवर टेकतो न टेकतो तोच नानूने पहिला बॉल टाकला, "आपण हॉलोवीन डेकोरेशनसाठी काय करायचं?". मागच्या वेळचा अनुभव ताजा असल्याने, त्याचं मी ऐकलंच नाही असं भासवून माझ्या कानपूटरचा कान पिळून चालू करायला लागलो. पण एकवेळ शिवाजी महाराजांची आग्राहून सहज सुटका होईल, पण या नानूच्या तावडीतून सुटका नाही. माझ्या खांद्यावर थोपटून त्याने त्याच्या प्रश्न पुन्हा केला. वास्तविक गोरंपान गुळगुळीत टक्कल, काळी-पांढरी छोटेखानी बोकडदाढी, साडेपाच फूट उंच आणी साडेचार फूट रूंद असला नानू साक्षात टीमरूम मधे असताना वेगळं डेकोरेशन कशाला असा विचार मनात आला. पण जिभेच्या टोकावर आलेले ते शब्द निर्धाराने गिळत मी क्षीणपणे त्यालाच म्हटलं "तूच सांग बाबा". नानू उत्साहाने त्याच्या टेबलावर गेला आणि दोन पोती उचलून घेऊन आला. त्यात लेगोचे लहान लहान असंख्य तुकडे भरले होते. "माझ्याकडच्या हॉलोवीनच्या लेगो भांडारातले थोडे तुकडे आणलेत. आपण त्यातून काहीतरी बनवू शकतो." हे एवढे थोडे ! हा माणूस लेगोचे तुकडे नाष्टा म्हणून दुधात घालून खातो की काय?  काही वर्षांपूर्वी माझ्या मुलाला लेगोमधे इंटरेस्ट आहे हे मीच त्याला बोललो होतो ! पण त्याचा आज पश्चात्ताप करावा लागेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. माझ्या मुलाचा सुद्धा लेगोमधला इंटरेस्ट संपून आता मिडल-स्कूल च्या नावाखाली नवे नवे इंटरेस्ट वाढीला लागलेत. पण नानबा मात्र तिथेच अडकलाय.

त्याच्या उत्साहावर पाणी टाकावं असं मात्र मला वाटेना. "लंचटाईम मधे करुया हां." असं त्याला सांगीतल्यावर खूष होऊन तो त्याच्या टेबलाकडे वळला. खरं म्हणजे मला स्वतःला त्या तुकड्यांसोबत खेळण्यामधे काडीचाही इंटरेस्ट नाही. एक तर त्याला खूप वेळ लागतो. जो तुकडा हवाय तो कधीच सापडत नाही. मग उगाच आणखी त्रागा होतो. माझा मुलगा जेव्हा लेगोचं काहीतरी बनवूया म्ह्णून पाठी लागायचा तेव्हा "थोड्यावेळाने ... माझा चहा पिऊन झाल्यावर येतो बरंका, तोपर्यंत तू सुरूवात कर हां" म्हणून मी त्याची बोळवण करायचो. तेवढ्या वेळात तो स्वतःच लेगोचं जे काही असेल ते बनवून संपवायचा (म्हणजे त्याचं संपेस्तोवर मी चहा पिण्यात वेळ घालवायचो). आत्ता तीच श्ट्रेटेजी नानूलापण लागू पडेल का?  

वेताळा, वाचव रे बाबा.  

Thursday, October 15, 2015

नानू सरंजामे

आज मला नानू सरंजामे भेटला. पुलंच्या धोंडोपंतांना ज्याप्रमाणे नानूने त्याची  'गंधगाथा' वाचायला दिली होती आणि जी वाचून धोंडोपंतांची रात्रीची झोप उडाली होती तसंच काहीसं माझं आज होणार आहे असं वाटतंय. 

तर हा नानू ऑफिसात माझ्या शेजारीच बसतो. माझ्या सुदैवाने कविता वगैरे करत नाही पण एम् टिव्हीवर गाणी चालू असताना पडद्यावर जी काही (वि) चित्र  दिसत असतात ना, तसल्या प्रकारची 'व्हीजेगिरी' करायची त्याला खोड आहे. (लग्न झालेलं नाहीये, म्हणून मग घरी गेल्यावर मग हे असलं काहीतरी करत बसतो). तर आज माझ्या डेस्क्वर काही सिड्यांची थप्पी घेऊन आला. त्यातल्या साताठ सिड्या पुढे ठेऊन त्यात त्यानी काय काय करामती केल्यात ते ऐकवायला लागला. आधिच माझं पाश्चिमात्य संगिताचं ज्ञान अगाध. माझं उगाच 'हो का ! अरे वा मस्त' वगैरे चालू होतं. एक तर नुकताच आलो होतो. आणि  अजून इ-मेलही चेकवलं नव्हतं. (आल्या आल्या इ-मेल चेक केलं नाही तर अशा वेळी नेमकं महत्वाचं इ-मेल आपली वाट बघत बसलेलं असतं असा माझा अनुभव आहे). त्यामुळे खाज आली असताना खाजवता येऊ नये असं काहीसं फिलींग येतं होतं. पण हे भाऊ काही थांबेनात. शेवटी मी जांभई लपवायचा प्रयत्न सोडून दिल्यावर पाचव्या जांभईला त्याने दोन सिड्या माझ्या हातात दिल्या. आमच्या 'नाही बोलता न येण्याच्या' स्वभावामुळे ही असली अपत्ये (आपत्तीचे अनेकवचन??) आमच्या गळ्यात पडतच असतात. तरी बरं सिड्यांवरची पिंकफ्लॉईड आणि बीटल्स ही दोन नावं तरी मला माहित आहेत. जाता जाता त्या सिड्यांमधली काही व्हिजेगिरी 'पीजी-१३' असल्यांचं त्यानं सांगितलंय तेव्हा त्याचं हे अपत्य आमच्या घरच्या अपत्याच्या हातात पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

Wednesday, October 7, 2015

मी आणि माझी डोकेदुखी!


मला डोकं आहे याचा पुरावा वेळोवेळी ठणकून माझं डोकं मला देत असतं. डोकेदुखी माझ्या पाचवीला पुजली आहे. म्हणजे अक्षरशः पाचवीत असल्यापासून मला डोकेदुखी आहे. एकदा डोकं दुखायला लागलं की मग दोन-एक तास शांत झोपल्याशिवाय काही बरं वाटत नाही. हा उपाय मी माझ्यापुरता शोधून काढला आहे. 

माझ्या पहिल्या-वहिल्या डोकेदुखीची आठवण मात्र खूप खोल रुतून बसली आहे. आमच्या शाळेची कर्नाळयाला सहल गेली होती. सक्काळी लवकर उठून बसमधे बसेपर्यंत सगळं ठीक होतं पण बस सुरू झाली आणि डोक्यात  घंटानाद चालू झाला. दुपारी डबा खाण्याची वेळ झाली तोवर डोकं ठणकायला लागलं होतं. माझ्या डब्यात आईने पावभाजीची भाजी आणि पोळी दिली होती. आमच्याकडे आदल्या दिवशीची फ्लॉवरची भाजी उरली की दुसर्‍या दिवशी पावभाजी असायची. खरं तर काही खाऊ नये असं वाटत होतं पण डबा संपवलाच पाहिजे असा लेलेबाईंनी दम भरला; मग बळेबळे डबा खाण्याशिवाय पर्याय नव्हता. कसाबसा दिवस संपला. परतायच्या वेळेला बसमधे आमचा वकार युनूस झाला होता. बाबा घ्यायला आलेले. 'बस लागली असेल' अशा वाक्याने माझ्या डोकेदुखीची कारणमिमांसा करण्यात आली. माझ्या डोकेदुखीची जी असंख्य कारणं आहेत त्यातलं हे पहिलं. ही पहिली आठवण इतकी जबरदस्त आहे की अजूनही (घरातल्या) पावभाजीचा वास आला की मला डोकं दुखेल की काय असं वाटतं.

तेव्हापासून आजपर्यंत घरात माझी (आणि पर्यायाने घरच्यांची) डोकेदुखी, त्याची कारणे आणि उपाययोजना यावर निरंतर परीसंवाद चालू आहे. पहीला वहीम अर्थात डोळ्यांवर होता, म्हणून डोळे तपासले गेले. डाव्या डोळ्याचा ०.५० आणि उजव्याचा ०.७५ असं सांगीतलं गेलं. काही महिने चश्मा चढवून काढले.  पण डोकेदुखी जेसे थे. पुन्हा डोळे चेक केले तर नंबर उलटे ! म्हणजे उजव्या डोळ्याचा ०.५० तर डाव्याचा ०.७५! पुन्हा चश्मा बदलून पाहिलं पण काही फरक नाही. तेव्हा डॉक्टरांच्या डोळ्यांचा नंबर बदललाय की काय अशी शंका यायला लागली. डॉक्टर बदलले की नंबर बदलायचा. शेवटी तो नाद सोडला. शिवाय चश्मा लावायला लागल्या पासून डोकं दुखायची फ्रीक्वेंसी वाढलीच होती.    

सुरूवातीला आई-बाबांनी वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, अगदी डोकं दुखत असताना मला बाबा डाॅक्टरांकडे घेऊन गेले म्हणजे म्हणे त्यांना लगेच कळेल. डोकं म्हणजे त्यांच्या जुन्या स्कूटरचं इंजिन वाटलं की काय त्यांना कोणास ठाऊक. तर पुढे इतरेजनांच्या सांगण्यावरून आयुर्वेदीक, होमीयोपॅथिक सगळं सगळं झालं. (बायदवे, आयुर्वेदिक औषधांचा म्हणे काही साईड इफेक्ट नसतो. ही अफवा ज्या कोणी पसरवली असेल त्याला त्रिफळा आणी सूत शेखर मात्रेची धुरी दिली पाहीजे). जो भेटायचा तो उपाय सांगायचा. थोडक्यात सांगायचं तर एक फक्त बोकड तेवढा कापला नाही देवाला, बाकी सगळे प्रकार करून झाले. (अर्थात बोकडा-ऐवजी गाय-बैलाचा बळी दिला असता तर डोकदुखी आणी डोकं एकदमच गायब झालं असतं).

वर्षामागून वर्ष गेली. लोकांना जाणवलेली माझ्या डोकेदुखीची कारणांची लिस्टही वाढत गेली. "उन्हाचा त्रास होत असेल", "चहाची सवय आहे हो त्याला", "पाणी कमी जातंय शरीरात", "पित्ताचा त्रास वाटतोय", "कामाचा ताण वाढतोय का?", "बाहेरचं जेवण कमी करा!", "वेळच्यावेळी जेवावं झोपावं माणसाने!", "यु शूड चेक फॉर सायनस", एक ना अनेक. थोडक्यात शेंडीपासू मांडीपर्यंत शरीरात कुठे काही खुट्टं झालं की पहिले पडसाद माझ्या डोक्यात पडतात अशा निष्कर्शापर्यंत मी येऊन पोहोचलो होतो. पुढे कॅनडात अमेरिकेत आलो आणि जिथे जेव्हा शक्य होतं तिथे डॉक्टरांना दाखवलं, पण डोकेदुखीला 'मायग्रेन' हे गोंडस नाव मिळण्यापलीकडे फारसं काही हाती पडलं नाही.

परवा एका ठिकाणी गेलो होतो तिथे जरा डोकं दुखतंय असं गाफीलपणे बोलून गेलो! झ्झालं! एका काकूंनी लगेच "डोकं दुखतंय का? थांब, बघू कुठं दुखतंय ते" म्हणत डोकं चाचपायला सुरवात केली. मी आपला पुरूषसुलभ लज्जेने ओशाळत "अहो एवढं काही विषेश नाही" म्हणत क्षीण प्रतिकाराचा प्रयत्न केला. कधी एकदा जाऊन गुडूप झोपतोय असं झालं होतं. पण त्यांनी तर माझी मानगूटच पकडली आणि खांदे आणि मानेला अंगठ्याने दाबायला सुरूवात केली. बायको बाजूला उभं राहून कौतुकानं बघतेय ! त्यांनी विचारलं "रेकी ट्राय करून पाहिली का?" मी मनात म्हटलं (अर्थात मनातच म्हणणार, कारण माझी मान अजून त्यांच्या हातात होती) म्हटलं "रेकी!!! आता ही बाई मला गाढवासारखं रेकायला वगैरे सांगते की काय? शिवाय त्यांचं मर्दन जर असंच चालू राहीलं तर तीही शक्यता होतीच.". पण मझ्या सुदैवाने तसला काही प्रकार नव्हता. रेकी म्हणजे माझ्या शरीरातल्या वाईट "वाईब्ज" काढून, चांगल्या वाईब्ज घुसवणे, हे ज्ञान मिळालं. त्या बाईंनी रेकीचा कोर्स केला होता आणि त्यांना माझ्यात त्यांचा गिनीपिग सापडला होता. पुढे १० मिनीटांचं एक अशी तीन सेशन तीन दिवस करून बघूया असा सल्ला कम दम मिळाला. हेही करून बघू म्हणून माझं मीच समाधान करून घेतलं (न करून सांगतो कोणाला). रेकीचं एक बरं आहे कुठे जायला यायला नको, रेकी देणारे त्यांच्या घरी, आपण आपल्या घरी. पण प्रामाणीक पणे त्यांच्या सूचनेबरहुकूम केलं. काल तिसरं सेशन संपलं. दिवसभरात तुम्हाला फार छान वाटेल असं मला सांगण्यात आलंय. आता काही 'पॉसिटीव वाइब्ज' येण्याची वाट बघतोय. पण वाट बघताबघता पुन्हा डोकं दुखायला लागलं नाही म्हणजे मिळवली. 

/किरण मराठे