Tuesday, December 11, 2018

तो मी नव्हेच !

रोजच्या सारखं सकाळी माझं खासगी ईमेल चेकवलं आणि अर्धा ताड उडालो. (पूर्वी तीन ताड वगैरे उडवायचो पण आजकाल वजन थोडं वाढलंय) पण वजनाचं एक असो, गेले काही महिने असे इमेल वाचून उडण्याचे प्रसंग माझ्यावर वारंवार येताहेत. हा प्रकार सुरू झाला तेव्हा, प्रायव्हसीला सोन्याच्या पारड्यात तोलणाऱ्या लोकांत राहिल्यामुळे असेल कदाचित, पण भारतात लोकांना अजिबातच कशी स्वतःच्या खासगी माहितीची पर्वा नाही याचा राग येऊन मी जब्बर वैतागायचो पण आता बराच निवळलोय. काय भानगड काय आहे ? सांगतो. सगळं बैजवार सांगतो. 

सुरवात आजच्याच पत्राने करूया. तर आज मला पणजी ब्यांकेनी <पणजी म्हणजे गोव्यातली नव्हे,आयची आयची आय ब्यांक... प्रत्येक वेळी एवढं मोठं नाव लिहायचा टंकाळा.. म्हणून पणजी !> नवीन गाडी घेतल्याबद्धल (आणि त्यांच्याकडूनच गाडीसाठी कर्ज घेतल्याबद्धल) अभिनंदन करणारं पत्र पाठवलंय ! आता ह्या पणजी ब्यांकेत माझंच काय पण माझ्या पणजोबांचंही खातं नाही. मग मी गाडी घेतली कधी आणि यांच्याकडून कर्ज तरी घेतलं कधी! पण पत्रासोबत जोडलेली टोचणी (मराठीत त्याला ईमेल अटॅचमेंट म्हणतात) उघडून बघितली आणि उलगडा झाला. किरण बाबुलाल मराठे नावाच्या सद्गृहस्थाने ह्या ब्यांकेतून कर्ज घेतलं होत आणि ईमेल देताना एखादं अक्षर गाळून चुकून माझाच इमेल दिला होता. आता ह्या माणसाला मी थेट ओळखत नसलो तरी आतापर्यंत त्याबद्धल बरीच माहिती मला आहे, जी कदाचीत बाबूलाल मराठयांना सुद्धा माहित नसेल. कारण ह्याची पत्र माझ्या पत्यावर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ह्या माणसाचं पणजी ब्यांकेत खातं आहे, तो स्वतः अमरावतीला राहतो. व्यवसायाने इंजिनेर असून सरकारी कंपनीत फिरतीची नोकरी करतो. त्याचा पत्ता, प्यान नंबर, फोन नंबर सगळं काही मला माहित झालं आहे. फक्त त्याच्या आणि माझ्या नामसाधर्म्यामुळे ! 

पण माझे नाव आणि आडनाव बंधू फक्त हे एकच नाहीत. 

आता किरण नेमीदास मराठे याची ओळख करून देतो. हा तगडा, गब्रू जवान कॉलेज संपवून नुकताच नोकरीला लागला असावा आणि पोरगा आता शेटल व्हायला हवा म्हणून नेमीदासकाका त्याच्या पडले असावेत. कारण याने मराठीशादी.कॉम वर खातं उघडलं आहे. गेला आठवडाभर मला मराठीशादी मधून सात आठ मुलीच्या प्रोफाइलची पत्रं येत आहेत. <प्रोफाइल उघडून बघायला गेलं तर तो पासवर्ड मागतो जो माझ्याकडे नाही त्यामुळे मी त्या प्रोफाईली उघडून बघत नाही काळजी नसावी. पत्रामध्ये थोडक्यात ओळख असते तेवढी बघतो. प्रोफाइल उघडताना पासवर्ड लागतो हे मला कसं समजलं? हा प्रश्न सध्या आपण पार्क करून ठेऊया> या प्रोफाईलींवरचे फोटो काही प्रेक्षणीय तर काही अतिप्रेक्षणीय सदरात मोडतात. मात्र त्या-त्या फोटोच्या खाली मात्र एका ओळीत दिलेला स्व-परिचय असतो. <हा मात्र इंग्रजीत असतो बरं का ! कारण “मराठी”शादी जरी असलं तरी मराठीतून स्वतःची ओळख करून देणं म्हणजे लग्नाच्या बाजारात स्वतःचीच किंमत कमी करून घेणं आहे झालं.> हां, तर तो परिचय वाचून मात्र त्या मुली कमनीय वगैरे न वाटता दयनीय वाटतात. असो, शेवटी नेमीदासांना कोणती सून मिळते कोणास ठाऊक! 

पण एकवेळ हा इसम परवडला, पण किरण राजाराम मराठे मात्र याही पुढच्या पायरीवर आहेत. हे गृहस्थ डॉक्टर आहेत. यांच्या नावाचं पहिलं पत्र मला जेव्हा आलं तेव्हा त्याचा विषय वाचूनच मी वारायच्या बेताला आलो होतो. रत्नागिरीच्या कुठल्याश्या पॅथॉलॉजि क्लिनिक मधून ते पत्र डॉक्टरसाहेबांना आलं होतं. कोणी नगमा कुरेशी तीन महिन्याच्या गरोदर असून आई आणि बाळ दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचा निर्वाळा त्यात होता ! ते वाचून आधी माझ्या पोटात गोळा आला. हे असलं पत्र चुकून बायकोनी वाचलं तर लाटण्यांनी डोकं फोडेल की वरवंट्याने या काळजीने मी तांब्याभर पाणी गटागटा प्यालो. पण स्वैपाकघराचं किचन झाल्यापासून पाटा वरवंटा ह्या गोष्टी हद्दपार झाल्याचं आठवलं आणि मानवाने तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीने उर भरून आला. कोणत्या गोष्टीचं कौतुक कोणाला कधी वाटेल काही सांगता येत नाही बघा ! असो तर त्या पत्राकडे वळू. आता ह्या कोकणस्थाला त्या यवनीच्या वाटेला जावंसं का वाटलं याच कुतूहल म्हणून ते पत्र उघडलं, तेव्हा श्री मराठे हे डॉ. मराठे आहेत आणि कुरेशीआपा त्यांच्या पेशंट असल्याचं कळलं. कोण कुठल्या त्या बाई पण त्या आणि त्यांचं होणारं पोर सुखरूप आहेत आणि डॉक्टरसाहेबांचा त्यात काही हात नाही (हं ! विनोद पुरे !) हे वाचून मला कित्ती बरं वाटलं म्हणून सांगू! 

असो, आता मी या प्रकाराला निर्ढावलो आहे. पत्र पाठवणाऱ्यांना “अहो, तो मी नव्हेच” असं वारंवार कळवळून सांगूनही काही फरक पडत नाहीये हे जेव्हा समजलं तेव्हा भाईकाकांना शरण गेलो. पुल म्हणून गेले आहेत ना, की “शेजारचा रेडियो ठणाणा करत असला तर ती गाणी आपल्यासाठीच लागली आहेत असं समजून ऐकावी, म्हणजे आपला मनस्ताप कमी होतो” ; तस्मात मी आता असल्या पत्रांची आवर्जून वाट बघतो आणि एखाद्या समांतर जगात आपण कोण आणि कसे झालो असतो असा थोडा खुळचट विचार करत बसतो. 

- किरण कमलाकर मराठे