Friday, November 13, 2015

हवाई नानू

नाही नाही, नानूचा आणि श्रीदेवीच्या हवाहवाई चा काही संबंध नाही, आणि नानू क्रिसमसला सुट्टीवर हवाईलाही जात नाहिये. मामला वेगळाच आहे. 
नोव्हेंबरचा महिना वेगवेगळ्या कारणासाठी महत्वाचा महिना ठरतो. आपली दिवाळी याच महिन्यात असते किंवा नुकतीच होउन गेली असते.  काही (पुरूष) मंडळी दाढी-मिशा वाढवून (नो-शेव नोव्हेंबर) प्रोस्टेट कॅंसर बद्धल जनजागृती करत असतात. (या नो-शेव नोव्हेंबरला सपोर्ट म्हणून या वेळी दिवाळीला आम्ही पण शेव केली नाही, फक्त चकल्या केल्या). पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थॅंक्सगिव्हींग आणि त्याच्या दुसर्‍यादिवशी असणारा समस्तांस आवडणारा ब्लॅक-फ्रायडे. ब्लॅक-फ्रायडे म्हणजे गिर्‍हाईकांची पर्वणीच. सगळ्या दुकानांमधून भरपूर सेल लागलेले असतात. कुठल्या दुकानातून काय आणायचं याच्या याद्या बनवून तय्यार असतात. पहाटेपासून किंवा रात्रीपासूनच काही दुकानांच्या बाहेर रांगा लाऊन हौशी मंडळी बसलेली असतात .. वगैरे वगैरे. मला असल्या लोकांबद्धल प्रचंड आदर असला तरी सुट्टीच्या दिवशी पहाटे उठून कोणी अर्ध्या भावात तूरडाळ जरी दिली तरी मी जाणार नाही.
माझ्यासारख्या आळशीमाणसांसाठीच इंटरनेटचा शोध लागला आहे त्यामुळे इंटरनेटवर कुठे काय सेल आहे ते बघत लंचटाईम मधे बसलो होतो. मागून पाठीवर नानूची पेटंट थाप पडली. "काय बेत आहे? काय काय घेणारेस येत्या ब्लॅक-फ्रायडेला?" त्यानं विचारलं. "बघतोय नुसतं. काही ठरवलं नाहीये. तू सांग, तूझा काय प्लॅन?". नानू याच प्रश्नाची वाट बघत होता. बर्‍याच लोकांना ही एक सवय असते, गेल्या सुट्टीत कायकाय मजा केली हे त्यांना सांगायचं असतं.पण कोणी विचारल्याशिवाय कसं सांगणार? मग ते दुसर्‍याला विचारतात "काय केलं सुट्टीत?"; बहुतेक वेळेला दुसरा माणून प्रतिप्रश्न करतोच आणी मग त्यांना साग्रसंगीत सुट्टीचा वृतांत देता येतो. नानू अशा लोकांपैकीच एक. त्यामुळे मी त्याला विचारताच त्याचे डोळे चमकले. खुर्चीचा पुढा माझ्याकडे वळवत त्याने सुरवात केली.
"मला गो-प्रो क्यामेरा घ्यायचाय". आता हा गो-प्रो क्यामेरा उंच डोंगरांवरून बर्फावरून घसरणारी, किंवा सायकल / मोटारसायकलवरून गडगडणारी वगैरे मंडळी त्यांचा उपद्व्याप टिपण्यासाठी करतात हे मला माहीत होतं. पण खुर्चीतल्या खुर्चीत बसणारा नानू याचा काय उपयोग करणार हे मला समजेना! माझा चेहरा प्रश्नार्थक झाला असावा, कारण नानूने लगेच खुलासा सुरू केला. "अरे मी ते ड्रोन क्वाडकॉप्टर पण घेणारे" ... अरे देवा! गेल्याच आठवड्यातल्या काही बातम्या माझ्या डोळ्यासमोरून गेल्या.   कोणीतरी त्या रिमोटवर चालणार्‍या द्रोणाला क्यामेरा अडकवून शेजारपाजार्‍यांच्या भिंतीवरून डोकावून बघायचा प्रयत्न केला. पण शेजारी महा-रागीट! त्याने बंदुकीने सरळ त्या द्रोणाला गोळी घातली... आणि मग त्यांनी एकमेकांवर दावा केला...ई.ई. आता हे नानू महोदय पण असलंच काही करणार की काय? मी आपल्या त्याला मित्रत्वाचा सल्ला दिलाय की बाबारे, असलं काही करून नकोस. पण नानूचे पंख छाटणे अवघड आहे. आगे क्या होगा खुदा जाने!