Tuesday, August 16, 2016

नानूचं पत्र

नानूचं पत्र माझ्या ऑफिसच्या खात्यात आलेलं बघून थोडं साशंक मनानेच त्यावर टिचकी मारली. मागच्या वर्षीच कंपनीने गुपचूप नानूला बाइज्जत दूर नेऊन सोडलं होतं. त्याच्या नशीबाने त्याला दुसर्‍या गावात लगेच नोकरी मिळालीही होती. त्यानंतर एक दोन आठवड्याने त्याचं पहिलं पत्र आलं होतं. त्यात तरी नानू आनंदी वाटला होता. त्याच्या सहकार्‍यांनी नव्या कंपनीत त्याचं चांगलं स्वागत केलं होतं. नविन मनिजरही सत्ययुगातले असावेत असे प्रेमळ मनमिळाऊ इ.इ. होते. कामही विषेश अवघड नव्हतं असं म्हणाला होता. तेव्हाच मी मनात म्हटलेलं की बाबारे, नोकरीनंतरचे पहिले काही दिवस हे लग्नानंतरच्या पहिल्या दिवसांसारखेच गोग्गोड असतात! मग लवकरच हे 'दिवस जातात', आणि डिलीवरीची वेळ येऊन ठेपते. तेव्हा आत्ता फार हुरळून जाऊ नकोस. अर्थात शहाण्या माणसाने नानूला 'सल्ले' देण्याच्या भानगडीत पडू नये, हे मला चांगलंच माहित असल्यामुळे, त्याच्या पत्रावर "अरे वा! भलतीच मजा आहे तुझी हं! यु आर व्हेरी व्हेरी लक्की हां!" छाप उत्तर देऊन टाकलं होतं.

पण आज असं वाटतंय, की तेव्हा त्याला खरं मत सांगीतलं असतं तर बरं झालं असतं, कारण आजचं त्याचं पत्र त्याच्या प्रसूतीवेणांनीच भरलेलं होतं. या नव्या कंपनीत म्हणे दर दोन ते तीन आठवड्यांनी रीलीजेस, शिवाय आधिच्या रिलीज मधे केलेल्या चुका सुधारणे (त्या सुधारताना नविन चुका भरणे), दर रिलीज नंतर त्याचा रिपोर्ट मनिजरांना देणे, त्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नसल्यामुळे त्यांच्या शिव्या खाणे, यामुळे नानू पुरता नामोहरम झाला होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं त्याचे सहकारीही एकेक करून सोडून चालले होते. त्यांमुळे बिचारा अगदीच हवालदिल का काय म्हणतात तसा वाटला. 

नानूला आता माहेरची आठवण होऊ लागली आहे. "कुठं काही जमतंय का बघा ना" असं म्हणून माझ्यासारख्या त्याच्या बरोबर काम केलेल्या इतर सहकर्मचार्‍यांच्या दाढ्या कुरवाळच्याचं काम सध्या करतोय. कोणास ठाऊक कदाचीत त्याच्या पूर्वपुण्याईवर तो इथे परत येईलही. तोवर त्याच्या पुढच्या डिलीवरीसाठी शुभेच्छा देऊन पत्र बंद करावं आणि अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आपल्या तारखांवर लक्ष ठेऊन असावं हे उत्तम!

Friday, May 6, 2016

देव आणि दगड

असं म्हणतात की परमेश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तीशाली, सर्वगुणसंपन्न, सर्वत्र, सर्वकालीन आहे. साध्या भाषेत सांगायचं तर देवाला सगळ्ळं आधीच माहीत असतं. तो कायप्पण बनवू शकतो आणि जमिनदोस्तही करू शकतो. तो जे काही करतो ते चांगल्यासाठीच्च करतो आणि तो कधीच्च चुकत नाही. तो जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे असतो आणि तो कालपन, आजपन, उद्यापन अश्या प्रकारे सगळ्या काळात स्थिर आहे.

अर्थात हे त्याचं वर्णन वेदांमधे, पुराणांमधे किंवा बायबल , कुराणामधे केलं आहे की नाही ते माहीत नाही. पण त्याचं हे स्वरूप सर्वांनीच या ना त्या संदर्भात ऐकलंच असेल.

आता या वर्णनावरून जर देवाची कल्पना करायचा प्रयत्न केला तर या वर्णनात किती मोठे लोचे आहेत ते लगेच लक्षात येतं. एक छोटासा प्रश्नही या समजूतीला सुरूंग लाऊ शकतो.

उदा. "जर देव सर्वशक्तीशाली आहे, तर तो असा दगड बनवू शकतो का की जो तो स्वतःसुद्धा उचलू शकणार नाही?" काय द्याल याचं उत्तर? "नाही" दिलं काय आणी "हो" असं दिलं काय, दोन्ही-बाजूंनी देव सर्वशक्तीमान नाही हेच सिद्ध होत नाही काय ?

दुसरं उदाहरण, "देव पाप करू शकतो का?" जर करू शकतो तर देव परम पवित्र ठरत नाही आणि जर पाप करू शकत नसेल तर देव सगळ्ळं सगळ्ळं करू शकत नाही.

आणखी एक झोल, जर देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच असतं तर मग 'मला पास कर' किंवा 'मला मुलगा/मुलगी होऊ दे' किंवा 'मला आजारातून बरं कर' वगैरे प्रार्थना करून आपण त्याच्या परफेक्ट प्लॅन मधे ढवळाढवळ का करतो? जर परिक्षेत मी पास झालो तर मी पास होणारच होतो (प्लॅन के मुताबिक!), आणि जर नापास झालो तर ते देवाने माझ्या भल्यासाठीच केलं असणार! मग माझ्या प्रार्थनेचा काय परीणाम ? आणि समजा देवाला माझी दया आली आणि त्याने मी नापास होत असतानाही मला पास केलं (भगवान, तुमने मेरी सुन ली ??) तर मग त्याने माझं वाईट नाही का होणार? थोडक्यात एकतर देव सर्वज्ञ नाही किंवा भक्तांच्या प्रार्थनेमुळे काहीच फरक पडत नाही किंवा जे करतो ते भल्यासाठीच असं नाही!

कुछ तो गडबड है दया!

Sunday, April 17, 2016

बाग आणि माळी

राम आणी श्याम दोघे अगदी घट्ट मित्र. लहान असताना ते गावाबाहेरच्या मैदानात खेळत असत. त्यामैदानाच्या बाजूने खूप सगळी झाडं फुलाफळांनी बहरलेली होती.

खूप वर्षांनी राम आणि श्याम पुन्हा गावात आले. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते दोघे त्या मैदानात गेले. त्या मैदानाच्या बाजूची झाडं आजही तशीच बहरलेली होती.

राम म्हणाला, "वाः, काय मस्त जागा आहे आजूनही. आपण इथे नसताना इतकी वर्षं कोणतातरी माळीच ह्या जागेची काळजी घेत असला पाहिजे!"

त्यांनी शोधायचा खूप वेळ प्रयत्न केला पण त्या दोघांनाही तो दिसला नाही.

राम म्हणाला, "कदाचीत तो माळी रात्री येत असेल."

श्याम म्हणाला, "आपण इथे रात्रीसाठी क्यामेरा लाऊन ठेऊ, म्हणजे तो माळी कोण ते आपल्याला कळेल"

त्याप्रमाणे त्यांनी क्यामेरा लाऊन ठेवला आणि घरी गेले.

दुसर्‍या दिवशी मोठ्या आशेने त्यांनी क्यामेरा चालू केला, पण त्या क्यामेरात झाडांशिवाय कोणाचेच चित्र नव्हते.

राम म्हणाला, "कदाचीत तो माळी अदृश्य असेल."

मग त्यांनी माळ्याला शोधायचा चंगच बांधला आणि वासावरून माग घेणारे कुत्रे आणले, पण व्यर्थ!

राम म्हणाला, "कदाचीत त्याचा वासही जाणवत नसेल."

श्याम म्हणाला, "मग आपण इथे ध्वनीलहरी पकडणारं रडार लाउन ठेऊ, त्याशिवाय ह्या बारीक तारांचं जाळं पसरून ठेऊ. त्यामुळे इथे थोडीजरी हालचाल झाली तरी आपल्याला लगेच कळेल!"

त्याप्रमाणे त्यांनी सगळी उपकरणं लाऊन ठेवली.

पण दुसर्‍या दिवशी पुन्हा त्यांच्या पदरी निराशाच पडली. रडार उपकरणाने कोणतीही हालचाल दाखवली नाही. तारांची जाळीही जशी होती तशीच!

मग राम म्हणाला, "हा माळी कदाचीत कोणत्याही प्रकारे आपण जाणून घेऊ शकत नाही. आपल्या पाचही संवेदना याचं अस्तित्व दाखवत नाहीत."

श्याम म्हणाला, "जर असं असेल तर, -असा माळी जो आपण बघू शकत नाहे, ऐकू शकत नाही, स्पर्शू शकत नाही, कोणत्याही इंद्रीयांनी त्याचं अस्तित्व मोजू शकत नाही आणि - ही झाडं निसर्गतःच वाढत आहेत, कोणी माळीच नाही! यातला फरक तो काय?"

Thursday, January 14, 2016

नानूची गच्छंती !

पुलंच्या नानू सरंजामेचा नान् सरंजामे कसा झाला ते तुम्हाला माहित असेलच. नानूचे रंगेबिरंगी चाळे दिवसेंदिवस वाढतच होते, आणि एक दिवस कंबरेखाली दुखतंय का असा प्रश्न पडला आणि आठवलं की मंगळदासशेट्नी ढुंगणावर लाथ मारून हाकलून लावलं आहे. तसंच काहीसं आमच्या नानूचंही झालं.
मागच्या महिन्यातली गोष्ट. नाताळच्या सुट्ट्या थोड्याच दिवसांवर येऊन ठेपल्या होत्या, त्यामुळे प्रत्येक जण खुषीत होता. ऑफिसमधे मात्र नानू वाकडा चेहरा घेउन बसला होता. पण लगेच कसं विचारणार म्ह्णून मग सकाळची थोडी कामं आटपून झाल्यावर मी सहजच त्याला छेडलं, "काय नानू, क्रिसमसच्या सुट्ट्यांमधे काय बेत?", नानूला एवढी फुंकरसुद्धा खूप होती. दिवाळीच्या फटाक्यांप्रमाणे त्याची वात सुरसूरली आणि नानू सुरू झाला, "अरे मला दुसरा जॉब बघायला सांगीतलाय! सगळे साले फुल्या-फुल्या-फुल्या! आमच्याच टीमने कान फुंकले असणार!" वगैरे वगैरे बराच वेळ तो बोलत होता. मी त्याला काय समजावणार? इथे कोणाचीच नोकरी सुरक्षीत नाही, मग तो नानू असो, मी असो किंवा आमचा साहेब असो.
पण ही वेळ नानूवर आज ना उद्या येणारच होती. गेल्या काही महिन्यांत त्याच्या टिममधल्या इतर लोकांबरोबर त्याचे वारंवार खटके उडत होते. कारण बहुधा नानूचं विचीत्र वागणं आणि नको तिथे नको ते बोलणं हेच असायचं. कष्टमरला कसा रिपोर्ट हवा तेही नानू ठरवायला लागला आणी त्याला समजावण्यातच बाकीच्यांचा जास्त वेळ जाउ लागला. आमच्या साहेबानी त्याला सौम्य शब्दात जाणिव करून दिली पण नानू सौम्य वगैरे शब्दांनी बधणार्‍यांपैकी नव्हताच. शेवटी मग साहेबानी त्याला दुसरी नोकरी शोधण्याचा सल्ला वजा इशारा दिला.
दोन दिवसांनी नानू रिकामं खोकं घेऊन आला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. नानूने त्याचं चंबू गबाळं त्या रिकाम्या खोक्यात कोंबायला सुरूवात केली. त्याबद्धल विचारल्यावर लांबच्या एका गावात त्याला तात्पुरती नोकरी मिळाल्याचं त्याने मला सांगीतलं. मलाही त्याचं बरं वाटलं. पण त्याचं असं तडकाफडकी जाणं कोणालाच बरोबर वाटलं नाही. दोन-तीन वर्षांत त्याने केलेल्या कामाचं हस्तांतरण न करताच त्याच दिवशी दुपारी नानबाने ऑफिस सोडलं.
आता त्याची खुर्ची रिकामीच आहे. पुलंच्या नानूचा नान् सरंजामे झाला. मोठा समाजसुधारक म्हणून त्याची ओळख अन्नपूर्णाबाईंनी करून दिली तर पेपरात फोटोही छापून आले. कोणास ठाऊक कदाचीत आमचा नानोबाही नान् सरंजामे होऊन परत येईल. त्याची ओळख करून देण्यासाठी या पोष्टींचा नक्की उपयोग होईल.