Saturday, April 21, 2018

पुस्तक वेडा (एक लघुकथा)

सुनिलला वाचनाचं फार म्हणजे फारच वेड. आठवी/नववीतल्या इतर मुलांच्या मानाने सुनिलचा व्यासंग कोणालाही थक्क करेल असाच होता. कोणतंही पुस्तक हाती आलं की ते वाचून पूर्ण केल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे, मग कुठलाही विषय असो. आई-वडिलांनाही त्याच्या वाचनाचं फार कौतुक होतं. त्याच्या सुदैवाने घरची परिस्थिती उत्तम असल्याने त्याचा कोणताही हट्ट लगेच पूर्ण होत असे.

त्याच्या घराच्या जवळच रेगेकाकांचं ग्रंथभांडार होतं. सुनिल तिथला नेहमीचाच गिऱ्हाईक. ह्या दुकानातून शेकडो पुस्तकं त्याने विकत आणून वाचली होती! (वाचनालयातली वापरलेली पुस्तकं त्याला चालत नसत.. प्रत्येक पुस्तक नवीन हवं).

आजही नेहमीप्रमाणे तो दुकानात बसून पुस्तकं चाळत होता. बहुतेक सगळीच पुस्तकं त्याने वाचलेली होती. गेल्या काही दिवसांत काही नविन वाचायलाही मिळालं नव्हत. त्यामुळे त्याला फार उदास उदास वाटत होत. शेवटी दोन एक तास झाल्यावर घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा रेगे काकांनी त्याला हटकलं, "हं मग काय घेतलंस आज ?" पण त्याचे हात रिकामेच होते. तो निराशेने म्हणाला, "आज काहीच नाही काका. नविन चांगलं काही आलंय का?" रेगेकाका क्षणभर घुटमळले. रेगेकाकांनी चष्मा काढून त्याच्या कडे बघितलं. मग म्हणाले, "एक मिनीटभर थांब." आणि दुकानाच्या मागच्या भागात लुप्त झाले. सुनिलला थेडी आशा वाटू लागली. मात्र पाचेक मिनिटं झाली तरी रेगेकाका येईनात म्हणून तो थोडा थोडा अस्वस्थ होऊ लागला. शेवटी एकदाचे काका आले.
हातात एक जाडसर पुस्तक होतं.  जरी नवं कोरं दिसत असलं तरी त्यावर साठलेली धूळ बघून ते तितकंही नवं नसावं असं सुनिलला वाटल. रेगेकाकांनी त्याचे भाव जाणून लगेच खुलासा केला, "हे पुस्तक शक्यतो कोणी घेत नाही त्यामुळे बाहेर ठेवलं नव्हतं."
सुनिलने पुस्तक हातात घेतलं, 'मृत्युचा खेळ', काळ्या लाल रंगसंगतीत लिहिलेलं पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहूनच त्याला ते पुस्तक आवडलं. ते उघडणार इतक्यात रेगेकाकांनी घाईघाईनं ते त्याच्या हातातून जवळ जवळ खेचूनच घेतलं. सुनिलने आश्चर्याने त्यांचाकडे बघितलं. काका थोडे नर्वसच वाटले. त्याला म्हणाले, "हे पुस्तक मी तुला देईन पण एका अटीवर..."
"कसली अट?" आजवर काकांनी कधी अटी बिटी घातलेल्या नव्हत्या.
"हे पुस्तक मी तुला विकत देतो, पण ... " काका पुन्हा अडखळले, " पुस्तकाचं सर्वात पहिलं पान ज्यावर लेखकाचं नाव, प्रकाशक, आवृत्ती वगैरे लिहिलेलं असतं ना, ते मात्र तू वाचायचं नाहीस. चुकूनही नाही."
"हं!" असली विचित्र अट सुनिलने कधीच ऐकली नव्हती. पण पुस्तकातली कथा त्याला पूर्ण वाचता येणार होती. त्यामुळे जास्त आढेवेढे न घेता त्याने ती अट मान्य केली.
"कितीला आहे हे पुस्तक?" त्याने खिशातून पाकिट काढत विचारलं.
"फक्त पाचशे रुपये, तुझ्यासाठी म्हणून फक्त तीनशे मधे देतो".... तसं पाहिलं तर ती किंमत फार वाटत होती. पण आता पुस्तक वाचण्याची उत्सुकता सुनीलला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने पाकिटातून पैसे काढून काकांच्या हातावर टेकवले, आणि सुसाट वेगाने धावत घरात आपल्या खोलीत जाउन पुस्तक वाचायला सुरूवात केली. पुस्तक उघडताना पहिलं पान उघडणार नाही याची दक्षता त्याने घेतली होती. 
...
शेवटचं पान वाचून त्याने पुस्तक मिटलं तेव्हा रात्रीचे अडिच वाजले होते. आता सुनिलचं मन त्याला स्वस्थ बसू देईना... पहिल्या पानावर एवढं काय आहे? एकिकडे नुकतीच वाचलेली भयकथा आणि दुसरीकडे पहिल्या पानावर काय आहे याचं कुतूहल... शेवटी मनाचा हिय्या करून त्याने पहिलं पान उघडलं.. त्यावरचे शब्द वाचून तो तीन ताड उडाला... ते शब्द होते
..
..
..
"किंमतः तीस रुपये"