Thursday, September 10, 2020

शेअर बाजार आणि मी

"अरे आज मार्केट पाहिलंस का? काय उसळलंय! व्वा !" मन्याचे शब्द कानावर पडले आणि एकदम जुनी टेप मनात सुरू झाली... 


चौथी किंवा पाचवीची उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. एके काळी आपल्याकडे उन्ह्याळ्याच्या सुट्ट्यांमध्ये "पोरांचं काय करायचं?" हा प्रश्न पालकांना आजच्याइतका भेडसावत नव्हता. पण पोरानं दुपारचं उगाच उन्हात उंडारू नये म्हणून आई पुस्तकं किंवा बैठे खेळ (ज्याला मराठीत बोर्ड गेम म्हणतात ते) घेऊन यायची. तर, त्या वर्षी तिने "नवा व्यापार" आणला होता. माझं "गणित" आणि बाबांचं "वेव्हार-ज्ञान" सुधारावं या सुप्त हेतूने तिने तो खेळ निवडला होता. अर्थात तिचे दोन्ही हेतू कधी साध्य झाले नाहीत ते सोडा! पण नवीन खेळ म्हणून उत्साहाने आम्ही पोरांनी तो खेळायला घेतला. चिरा बाजार, वरळी, नळकंपनी  वगैरे विकत घेऊ शकण्याच्या कल्पनेनेच खूप श्रीमंत झाल्याचं वाटत होतं आणि तेवढ्यात घात झाला. माझं प्यादं "व्यवहार" नावाच्या चौकोनांवर स्थिरावलं. कार्ड उचलून वाचू लागलो. "सट्टा बाजारात नुकसान! १०० रुपये भरा" ! बोंबला ! माझी सट्टा बाजाराची पहिली अधोगती इथपासूनच सुरू झाली. "बाबा सट्टा बाजार म्हणजे काय हो?" मी विचारलं, "जुगार असतो तो ! कधी खेळू नको हां" असं म्हणून बाबा त्यांच्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकिटाचा नंबर पेपरातल्या  निकालाच्या नंबराशी (शेवटापासून) पडताळून पाहू लागले. 

सट्टा बाजाराची किंवा शेअर मार्केटची अशी ओळख झाल्याने शेअर बाजारातला मत्त वृषभ व्ह्यायचा मी त्याऐवजी नुसताच बैलोबा झालो. पुढे कित्येक वर्ष सट्टा किंवा शेअर बाजार शब्द कानी पडले की शंभर रपये भरण्याचा आदेश देणारं ते व्यवहार कार्ड डोळ्यासमोर यायचं आणि हे असलं "व्यवहार" ज्ञान आम्हाला लहानपणीच मिळाल्यानं एक मराठी माणूस कोट्याधीश होता होता राहिला!

असो, पुढे दहावीच्या मार्कांनी डोळ्यासमोर काजवे चमकावल्यानंतर कॉमर्स शाखेत जाण्याचा योग आला. हो, इथे दोन गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. एक म्हणजे त्या वेळी ९८, ९९, १०० हे आकडे फक्त थर्मोमीटर मध्ये ताप आल्यावर दिसायचे , किंवा कधी चुकून श्रीकांत / गावसकर चांगली ब्याटिंग करत असले तर ! ९९ टक्के , ९९.७ टक्के,  १०० टक्के, हे असले अघोरी मार्क कोणालाच पडत नव्हते. दुसरं म्हणजे जितके मार्क मिळतील ते गपगुमान देवाचं दान समजून खालमानेनं ते दान पालकांपुढे ठेवायचे. आपलं कार्ट पुढे कुठे दिवे पाजळणार आहे हे पालक ठरवायचे. सायन्सला जाण्याएवढे मार्क मिळाले नाहीत तर कॉमर्स आणि तिथेही कोणी थारा दिला नाही तर आर्ट्स अशी सरळ सरळ विभागणी होत असे. मी पहिल्यापासूनच मध्यममार्गी ! त्यामुळे गपचूप जे पाहिलं कॉलेज मला आपलं म्हणेल तिथे प्रवेश घेऊन टाकला आणि पुढच्या आयुष्याचा / करियरचा प्रश्न देवावर सोडून दिला ( ज्याने चोच दिली तोच चारा वगैरे वगैरे ). 

इथे पुन्हा हे शिंचे शेअर पुढ्यात आले. बरं आले ते आले पण परीक्षेचे प्रश्न होऊन आले. आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास!  एकूणच तो "विषय सर्वथा नावडो" ला खतपाणीच मिळालं. ते प्रेफरंस शेअर , इक्विटी शेअर, डिबेंचर वगैरेंच्या जंजाळात कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीसारखी अवस्था झाली होती.  अकौंटिंग, इकोनॉमिकस, मार्केटिंग सारख्या त्रिदेवांनी ओये ओये करून विव्हळायची वेळ आणली होती. त्यांच्यावर कशीबशी मात करून परीक्षा देऊन पार पडलो तेव्हा अमरीश पुरीला माधुरी, सोनम आणि संगीता एकत्र नाचताना बघून जसा हर्षोल्हास झाला होता तस्सा चेहरा झाला होता ! 

नंतर कॉलेजचे दिवस संपून बैलाप्रमाणे काम करण्याचे दिवस आले आणि पैसे कमवायला किती ग घासावी लागते याची जाणीव झाली. काही मित्र होते जे शेर बाजाराची थोरवी सांगायचे. "अरे मी फक्त दहा हजार टाकले दोन महिन्यापूर्वी, आज त्याची किंमत पंधरा हजारावर गेलीये बोल!" बोल काय ?कप्पाळ? दहा हजार एक रकमी बघितलेही नाहीयेत अजून! 'टाकतोय' कुठून ! 'परसाकडेला पडत नाहीत' असं मी (मनात) म्हटलं!  "मी सांगतो तुला, आता पुढच्या काही महिन्यात मार्केट बघ कसं  रॉकेटसारखं वर जातंय ! दहाचे वीस होतील हां हां म्हणता ! माझं ऐक, तू पण टाकच थोडे. आत्ताच वेळ आहे. ही वेळ गेली ना तर पस्तावशील !" मित्र मला समजावत होता. "माझ्या पासबुकने कधी पाच आकडी नंबर बघितलेच नाहीत रे बाबा!" मी माझी झोळी उघडून दाखवली. "अरे यार, बडा सोचो !"  इतक्यात बिल घेऊन वेटर आला. मी त्याच्या तावडीतून वाचलो. त्याच्या म्हणजे वेटरच्या नव्हे! मित्राच्या तावडीतून, कारण त्याला अश्या वेळी महत्वाचा फोन येतो. 'दहा हजार, वीस हजार!?'  एवढे मोठे आकडे मी फक्त नाटक सिनेमांमध्येच ऐकले होते. ! काही लोकांनी अगदी लोन काढून पैसे गुंतवले होते म्हणे. ही असली जोखीम आमच्या पाच पिढ्यात कोणी घेतली नव्हती. त्या दिवशी कधी नव्हे ते उत्साहाने यासंबंधी घरी विषय काढला, तर मायबापांनी लगेच पाणी ओतलं ! "आपल्याला कतरीनाचा कितीही कैफ चढला असला तरी आपण हृतिक एवढे रोशन झालो नाही! उगाच स्टोव्हला पंप मारल्यासारखं नाचू नये" ! झालं ! माझा सगळा कैफच मावळला. आईने पोष्टाचे फॉर्म आणले होते. शेवटी आम्ही च्यायला  किसान विकास पत्र (साडेपाच वर्षात दाम दुप्पट !) आणि महाराष्ट्र ब्यांकेमध्येच ठेवणार पैसे ! 

मित्राने दावा केल्याप्रमाणे शेअर मार्केट रॉकेट प्रमाणे वर गेलं पण दिवाळीतल्या दारू संपलेल्या रॉकेट प्रमाणेच खालीही आलं. त्याच्या दहा वीस हजारांचं काय झालं कोणास ठाऊक पण बऱ्याच जणांचे हात पोळल्याचं समजलं. शेर मार्केट मधले सगळे शेर मिशी भादरल्यागत तोंड लपवू लागले. "चालायचंच रे बाबा.. शेअर बाजार म्हटला  की थोडं वर खाली चालायचंचया वेळेला मी त्यांना धीर देत होतो. ज्यांनी कर्ज घेऊन पैसे गुंतवले होते त्यांच्या तर गोळ्या कपाटात होत्या ! एकाने माझ्याचकडे थोडे पैसे मागितले. नंगा नाहाएगा क्या और निचोडेंगा क्या ? जितकी शक्य होती तेवढी मदत केली.   सुदैवाने थोड्या दिवसांनी बाजार वधारला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला .. पण त्या थोड्या दिवसांमध्ये त्याची अवस्था बघवत नव्हती. 

"काय रे कुठे हरवलास!" मन्याने पुन्हा या जगात आणलं ! "तू टाकलेस की नाही पैसे मार्केट मध्ये ?" मी नुसतंच हसलो आणि आईला स्मरून एफ डी रिन्यूचा फॉर्म भरू लागलो

- किरण मराठे