Monday, March 20, 2017

ह्या ढकल्यांचं कराल काय?


अहं, ढकले हे कोणाचं आडनाव नाहीये. किंवा ट्रेनमधे चकलीच्या सोर्यात भाजाणी भरतात तशी माणसं भरली असली तरी 'खाली है' म्हणत बाहेरून रेटत ढकलत राहातात त्यातले पण नाहीयेत. इंग्रजीत 'फॉरवर्ड' म्हणजेच मराठीत आलेला माल पुढे ढकलणारे जे असतात ना; मी त्यांच्या बद्धल बोलतोय. आपण त्यांना ढकलपंडीत किंवा कोरडे पाषाणही म्हणू शकतो.

आता प्रथम एक कबूलीजबाब मात्र मी द्यायलाच हवा. कधी एके काळी जेव्हा ताजं ताजं गरमागरम आंतरजाल बोटांशी आलं होतं तेव्हा मी सुद्धा जवळ जवळ रोज एक ई (ऽऽऽ)-मेल मित्रांना ढकलायचो. पुढे कधीतरी ती सवय आपोआपच सुटली. कदाचीत तुम्हीही जेव्हा आतंरजालीय बालकं असाल तेव्हा हे केलं असेल.

पुढे स्मार्ट्फोनचा जमाना आला, आणि आंतरजालाचं मायाजाल फारच फोफावलं. शाळेतल्या शेंबड्या पुतण्या-भाच्यांपासून, मूळव्याधीग्रस्त काका-मामांपर्यंत सगळेच माहीतीच्या सागरात आपापली धार सोडू लागले. सकाळच्या वेळी सुविचार पाठवल्याशिवाय प्रेशर येईनासं झालं. दिवसभरात इकडून तिकडून येणारे इ-नोद, सुभाषितं, बातम्या, इशारे, माहीतीपत्रकं, मदतीची आवाहनं आणि बराच माल आयात निर्यात व्हायला लागला. नव्हे ते एक आदीम कर्तव्यच बनलं. स्वतःच्या शब्दात लिहू शकणारे तसेही फार थोडेच असतात त्यामुळे दुसर्‍यांचे शब्द उधार घेऊन... आणि बहुतेकवेळा चोरून... आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवण्यात कोणाला कसली गंमत वाटते हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे.

तर ते एक असो. ह्या ढकल्यांची वर्गवारी करायची तर ती काहीशी अशा प्रकारे होईलः

१. फोन-कोंबडेः एक वेळ सकाळी सुर्य उगवायचा नाही, पण रोज सकाळी शुभ-सकाळ / गुड-मॉर्नींग छाप संदेश, झालंच तर “सूंदर अक्षर हाच खरा दागिना!” छाप सुविचार पाठवणारे ह्वॉट्सॲपी कोंबडे मंडळी आरवले नाहीत असं होणे नाही. बहुतेक शाळेत असताना फळ्यावर सुविचार लिहीण्याचं काम यांच्याकडे असावं. सुविचार वाचून लोकं चांगली वागतील असं ज्यांना वाटतं ते लोक अजूनही शाळेतच आहेत की काय असं वाटतं. गंमत म्हणजे व्हॉट्सॅपी ग्रूपमधे या कोंबड्यांच्या आरवण्यालाही दाद देणारी लोकं असतातच.

२. परोपकारी गंपूः या प्रकारात मदतीचं आवाहन करणारी मंडळी येतात. बरं मदतीचं आवाहन ज्यांच्यासाठी आहे त्यांना आपणच काय ही लोकं सुद्धा ओळखत नाहीत. बहुतेक वेळा ही गंपू लोकं स्वतः कोणालाच मदत करत नाहीत. पण आपण सतरा ग्रूपमधे तो संदेश ढकलल्यामुळे फार मोठं समाजकार्य केल्याचं समाधान मात्र या मंडळींना वाटत असावं.

३. सदा-सावधः सावधानतेचे इशारे हौशीनं पुढे पुढे पाठवत राहाणं हे यांचं मेन काम. मग ते इशारे महाराष्ट्र पोलीसांकडून असोत वा झांबीयाच्या पोलीसांकडून. विषेशतः बायकांनी कुठे कोणती काळजी घ्यावी याबाबत हे फारच दक्ष असतात. पुन्हा जे काही इशारे असतील ते चालू काळातले असतील असंही नाही. मागच्या वर्षींचे इशारेसुद्धा अजून पुढे पुढे ढकलले जात असतात.

४. आबापापू: म्हणजेच “आली बातमी पाठव पुढे”. आजकाल ताज्या बातम्या मिळण्यासाठी ट्विटर, फेबु आणि व्हाटसॅप हे मुख्य स्रोत बनत चालले आहेत. आणि यामागे या आबापापू लोकांची बोटं आहेत. बातमी कसलीही असो, म्हणजे मध्य पूर्वेत झालेला स्फोट असो किंवा पंतप्रधानांना लागोपाट आलेल्या तीन शिंका असोत, बातमी पसरवणं महत्वाचं. अर्थात बातमी खरी आहे की खोटी असल्या फालतू शहानिशा करायला यांना वेळही नसतो आणि इंटरेस्टही.

५. अस्मितावादीः ज्या लोकांना जगण्यासाठी अन्न-पाण्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या अस्मितेची गरज असते ते अस्मितावादी लोक. खरंतर असल्या लोकांचं पीक उदंड आहे. भाषिक असो वा भौगोलीक; अस्मिता नै तो कुच नै. मग अशा वेळी आपापला कंपू बनवणे आलेच. पण समानशील लोकं शोधण्यापेक्षा आपल्या विचारांशी जे सहमत होत नाहीत अशांची बदनामी करणे (आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणे) हे प्रमुख काम होऊन जातं. सगळ्यात वैताग आणणारी ही जमात आहे. सगळ्यांनी आपापले महापुरूष, आपापले सणवार वाटून घेतले आहेत. यांची अवघड जागी झालेली अस्मिता-गळवं इतकी टम्म फुगलेली की, कोणी वेगळा विचार मांडला की दुखावल्याच यांच्या भावना.

६. इनोदवीरः सगळ्यात कमी त्रासदायक प्रकार म्हणजे हे इनोदवीर. जुने विनोद नवीन नावं घालून पुढे पाठवणारे हे वीर खरं म्हणजे अगदीच काही टाकाऊ नाहीत. क्वचीत कधीतरी हाफिसात आपला मुरारबाजी झालेला असतो, अशा फोन थरथरतो, सहज लक्ष जातं आणि मित्राने अत्यंत पांचट ज्योक पाठवलेला असतो. तो वाचून क्षणभरासाठीतरी का होईना रक्तदाब कमी होऊन जातो. बरं वाटतं.

७. फेबु-मजनूः ह्या लोकांचा उपद्रव स्त्रीयांना जास्त होतो. प्रेमाचे अर्थपूर्ण संदेश ढकलणे हे यांचं मुख्य काम. रस्त्यावरच्या भुर्जीपाव किंवा चायनीस गाडीच्या बाजूला जिभल्या चाटत बसलेल्या कुत्र्यांमधे आणि या मजनूंमधे कमालीचं साम्य आहे. क्वचीत कधीतरी एखाद्या मुलीच्या प्रोफाईलवरून यांच्या एखाद्या पोस्टला लाईक आली की लग्गेच यांची लाळ गळायला लागते आणि यांचा ढकल सिलसिला चालू होतो. रस्त्यावरच्या कुत्र्यांप्रमाणेच एकदा हाडहाड केलं तर बरेचसे गप्प बसतात. पण कधीकधी एखादा पिसाळतोही. कधी कधी मुलीच्या नावाची खोटी प्रोफाईल तयार करून काही जण खडे टाकत असतात. पण गंमत म्हणजे यांच्या प्रोफाईलवर इतर मजनू येऊन सलगी करायला बघत असतात. एकूण यांच्या लीला दुरून पाहण्यात मजा आहे.

८. भक्तभाविकः ही जमात फॉरवर्ड उद्योगातली सगळ्यात प्राचीन काळापासून कार्यरत असलेली जमात आहे. म्हणजे अगदी जेव्हा कॉम्प्युटरही नव्हते तेव्हासुद्धा पोस्टाने ही मंडळी कोणत्यातरी बाबा बुआ माता देवी यांचे फोटो पाठवायचे आणि ते पुढे पाच दहा जणांना पाठवायला सांगायचे. आधुनिक काळातही तग धरून बसलेल्या ह्या मंडळींचं कार्य आता शतपटीनं सोपं झालंय. गुडगुडे बाबांच्या फोटोला पाहताक्षणीच लाईक करा आणी सात जणांना शेअर करा. असं केलंत तर एका तासात आनंदाची बातमी मिळेल. नाही तर कोणत्यातरी क्ष व्यक्तीने न वाचता डिलीट केलं आणी त्याचं कसं दिवाळं वाजलं याचा साग्रसंगीत व्रुत्तांत यात असतो. या पद्धतीचं यश इतकं की चांगली शिकलेली लोकंसुद्धा 'कशाला विषाची परीक्षा घ्या' असला विचार करून बिन्धास्त पुढे ढकलतात. याचं आणखी एक उपरूप म्हणजे कोण्या लहान मुलाला/मुलीला क्यांसर झालेला आहे तर त्या फोटोखाली आमेन लिहा. जणू वरती आकाशातला बाप फेसबूक उघडूनच बसलाय आणि दहा लाख लोकांनी आमेन लिहीलं तरच तो त्या मुलाचा जीव वाचवणारे. किंवा बिल-गेटस त्या फोटोला किती लाईक्स मिळाले ते मोजून तितके पैसे त्या मुलीला देणारे. कै च्या कै विचार करतात लोक. ह्यांना पाहिलं की ‘भगवान के नाम पे’ म्हणत भीक मागणाऱ्या भिकाऱ्याची आठवण होते. ते पैशाची भीक मागतात, हे लाईक्स ची इतकाच फरक.

९. खेळिये: या मंडळींनी एके काळी एवढा उच्छाद मांडलेला की त्यांना कंटाळून काही लोकांनी फेबु-आत्महत्या केली. सुरुवात फेबु शेतीपासून झाली. मग वांग्यांना पाणी घाल, डुकरांना खायला घाल असल्या आचरट विनंत्या हे लोकं करायचे. नंतर कोणत्यातरी फेबु-हाटेलात काम करणारे, स्वतः:ला जेम्स बॉण्ड समजणारे डिटेक्टीव्ह वगैरे झाले. आत्ता आत्ता पर्यंत गोळ्या-तोडणारे खेळ चालू होते. ही मंडळी फेबु वर त्यांचा स्वतः:चा वेळ कसा घालवतात याच्याशी काही घेणं देणं नाही; पण जेव्हा दुसऱ्यांना त्या खेळाची आग्रहपूर्वक निमंत्रण पत्रिका पाठवतात तेव्हा त्यांच्या पिढयांचा मनातल्या मनात उद्धार केल्याशिवाय राहवत नाही.

१०. शुभेच्छूक: पुर्वी दिवाळीच्या, नववर्षाच्या अश्या मोजक्याच मातबर दिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक फोन करायचे. पण आजकाल चतुर-फोन आल्यापासून संक्रान्तीपासून, संकष्टीपर्यंत सगळ्यां दिवसांच्याच्या शुभेच्छांचा खच पडत असतो. म्हणजे बहुधा लोक आपल्याला आलेले शुभेच्छासंदेशच ढकलत असतात, पण जरा कल्पना करा, जो कोणी संदेश प्रथम पाठवत असेल तो दररोज सकाळी भिंतीसमोर उभं राहून कालनिर्णय बघतोय, म्हणतो "अरे वा! आज भाद्रपद शु. चतुर्दशी का ! वा वा" आणि "ह्यापी भाद्रपद शु चतुर्दशी" असा मेसेज टायपतोय ! किती उत्साह! किती कळकळ !

तर हे ही असो. आपण सगळेच आंतरजालीय जीवजंतू. अजून काही वर्षांनी थोडे प्रगत जीव बनलो की कदाचीत याहून आणखी प्रकार वाढवू. कारण एकमेकां पास करू अवघे करू फॉरवर्ड !


/किरण मराठे